28.1 C
Latur
Wednesday, November 26, 2025
Homeमहाराष्ट्रविचित्र आघाड्यांमुळे नेत्यांसह मतदार संभ्रमात

विचित्र आघाड्यांमुळे नेत्यांसह मतदार संभ्रमात

कार्यकर्त्यांनी प्रचार कुणाचा करायचा?

नाशिक : प्रतिनिधी
मनमाडमध्ये महायुतीच्या शिवसेना आणि भाजपचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले असले तरी, जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेसेना असा सामना असल्याने मतदारही संभ्रमात पडले आहेत, तर मी कोणाविरोधात जास्त बोलणार नाही; परंतु त्र्यंबकेश्वरच्या भवितव्यासाठी भाजपला विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मतदारांना करीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

नाशकातील सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, भगूर, सटाणा, चांदवड, नांदगाव, मनमाड, येवला, पिंपळगाव बसवंत आणि ओझर नगर परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होत असून, माघारीनंतरचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत कुठे महायुतीच्या घटकपक्षांची मविआसोबत, तर कुठे मविआची महायुतीच्या घटकपक्षांसोबत हातमिळवणी झाल्याने विचित्र आघाड्या तयार झाल्या आहेत. मात्र, या विचित्र आघाड्यांचा मोठा फटका महायुतीतल्या नेत्यांना प्रचारादरम्यान बसत आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाला येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा आहे. त्यामुळे आक्रमक भाषणांसाठी ओळखले जाणारे फडणवीस यांना त्र्यंबकेश्वरमध्ये संयम बाळगावा लागत आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी महायुतीचे घटकपक्ष एकमेकांविरोधात लढत असल्याने फडणवीस यांनी उमेदवारांची नावे घेऊन नगरांच्या भविष्यासाठी भाजप उमेदवारांच्या पाठीशी राहा असे सांगत भाषण आवरते घेतले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी सटाणा, मनमाड आणि सिन्नर या तीन ठिकाणी सभा घेतल्या. सटाण्यात भाजप विरुद्ध शिंदेसेना असा सामना आहे, तर नांदगाव, मनमाडमध्ये शिंदेसेना आणि भाजप हे राष्ट्रवादी अजित पवार गटाविरोधात एकत्र आहेत. येवल्यात शिंदेसेनेसोबत चक्क राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. सिन्नरमध्येही तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतदारराजा संभ्रमात सापडला असून, नेमके मतदान कोणाला करायचे, असा पेच त्यांच्याही समोर उभा ठाकला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR