पुणे : प्रतिनिधी
राज्यात शेवग्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेवग्याचे पीक अक्षरश: उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे शेवग्याचा यंदाचा हंगाम विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे. एरवी घाऊक बाजारात दररोज ४ ते ५ हजार किलो शेवग्याची आवक होत असते. पण अल्पशी आवक आल्याने शेवग्याला ५०० रुपये किलो उच्चांकी दर मिळाला आहे.
मागणीच्या तुलनेत आवक अतिशय कमी झाल्यामुळे ही दरवाढ झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईसह राज्यभरातील दाक्षिणात्य उपाहारगृहचालकांकडून सांबार, रसमसाठी शेवग्याला वर्षभर मोठी मागणी असते. दररोज मोठी खरेदी करणारे हे व्यावसायिक आता वाढलेल्या दरामुळे चिंतेत सापडले आहेत.
शेवगा उष्ण असल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत गृहिणींकडून शेवग्याला मोठी मागणी असते. मधुमेह व इतर आजारांसाठीही शेवगा गुणकारी असल्याने त्याचा वापर वाढला आहे. त्यातच आता शेवग्याला सोन्याचा भाव आल्यामुळे ही आरोग्यदायी भाजी आता सर्वसामान्यांच्या ताटातून हद्दपार होण्याची भीती वाढली आहे.
संभाजीनगर, लातर, धाराशिवमध्येही आवक घटली
छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडीच्या मंडीमध्येही शेवग्याची आवक घटली आहे. लातूर, धाराशिव येथेही भाजी मार्केटमध्येही शेवग्याचे प्रमाण तुरळक असल्याने ६० ते ७० रुपये पाव या दराने किरकोळ विक्री झाल्याचे दिसून आले.

