नवी दिल्ली : गेल्या बुधवारी लोकसभेच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले होते. लोकसभा सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन व्यक्तींनी अचानक तेथून उडी मारून आरोपींनी सभागृहात गोंधळ घातला होता. या घटनेबाबत विरोधी पक्षाचे खासदार सातत्याने चर्चेची मागणी करत असून पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी याबाबत वक्तव्य करावे, अशी मागणी विरोधक करत आहेत. मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांनी कामकाजात अडथळा आणल्याच्या आरोपावरून आतापर्यंत दोन्ही सभागृहाच्या ९२ खासदारांना संसदेच्या उर्वरित हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आधी घुसखोरांनी लोकशाहीच्या मंदिर ‘संसदे’वर हल्ला केला, आता मोदी सरकार या विषयावर सभागृहात चर्चा न करून लोकशाही आणि संसदेवर हल्ला करत आहे. मोदी सरकारने खासदारांना निलंबित करून लोकशाहीचे नियम धुडकावून लावले आहेत. तसेच यानंतर सभागृहाचे कामकाज मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
लोकसभेतील निलंबित ३३ खासदारांची नावे
लोकसभेतील ३३ खासदारांपैकी ७ काँग्रेस सदस्य – अधीर रंजन चौधरी, अँटो अँटोनी, के मुरलीधरन, के सुरेश, अमर सिंह, राजा मोहन उन्नीथन आणि गौरव गोगोई यांना उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे.
टीएमसीच्या निलंबित सदस्यांमध्ये कल्याण बॅनर्जी, अपरूपा पोद्दार, प्रसुन्ना बॅनर्जी, सौगता रॉय, शताब्दी राय, असित कुमार मंडल, प्रतिमा मंडल, काकोली घोष दस्तीदार आणि सुनील कुमार मंडल यांचा समावेश आहे.
द्रमुकच्या ९ सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये टीआर बाळू, ए. राजा, दयानिधी मारन, जी सेल्वम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमाथी, के वीरसामी, एसएस पल्ली मनिक्कम आणि रामलिंगम यांचा समावेश आहे.
आययूएमएलचे ईटी मोहम्मद बशीर आणि के नवसिकानी यांना निलंबित करण्यात आले आहे. आरएसपीचे एनके प्रेमचंद्रन, जेडीयूचे कौशलेंद्र कुमार आणि व्हीसीके तिरुवक्कसर यांचाही निलंबित सदस्यांमध्ये समावेश आहे.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रस्तावावर सभागृहाने काँग्रेसच्या अन्य तीन खासदारांच्या विरोधात मतदान केले. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत जयकुमार, विजय वसंत आणि अब्दुल खालिक यांना निलंबित करण्यात आले आहे.