नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा समन्स पाठवून अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना २१ डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी ईडीने अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र अरविंद केजरीवाल यांनी ही नोटीस बेकायदेशीर ठरवत ती मागे घेण्याची मागणी केली होती.
त्यावेळी केजरीवालांनी ईडीला पत्र लिहून मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने येऊ शकलो नाही, असे म्हटले होते. केजरीवाल यांनी समन्सला “बेकायदेशीर” आणि “राजकीयदृष्ट्या प्रेरित” म्हटले होते आणि ते मागे घेण्याची मागणीही केली होती. त्यांनी केंद्रीय एजन्सीला लिहिले होते की, समन्समध्ये हे स्पष्ट केलेले नाही की मला एक व्यक्ती म्हणून, दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून किंवा ‘आप’चा राष्ट्रीय संयोजक म्हणून बोलावले जात आहे.