नवी दिल्ली : विरोधी खासदारांच्या निलंबनाच्या मालिकेत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याच्या आरोपावरून आणखी ४९ खासदारांना निलंबित केले. त्यामुळे या अधिवेशनात एकूण निलंबित खासदारांची संख्या १४१ वर पोहोचली असून ही आतापर्यंतची सर्वाधिक निलंबनाची संख्या आहे. विरोधी खासदारांच्या निलंबनावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि शहा यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेचा अपमान केला आहे.
ते म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी समोर आल्यानंतरही ते सभागृहात येऊन यावर वक्तव्य करत नाहीत. इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे, याचे मला खूप वाईट वाटते. अनेक खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. हे लोकशाहीचा भंग करण्यासारखे आहे, सभागृहाच्या प्रतिष्ठेचा घोर अपमान आहे. गेल्या आठवड्यात लोकसभेतील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्यानंतर विरोधी खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षेच्या बिघाडावर संसदेत उत्तर द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, काँग्रेस नेते शशी थरूर आणि कार्ती चिदंबरम, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाजात अडथळा आणल्याबद्दल मंगळवारी निलंबित केलेल्या खासदारांमध्ये समावेश आहे.
चर्चेची गरज नाही : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुरक्षेचा भंग ही “अत्यंत गंभीर” बाब असल्याचे वर्णन केले आणि त्यावर चर्चेची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले.