मुंबई : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने आयपीएल लिलावातील आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. पॅट कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने २०.५० कोटी रुपये मोजले आहे. पॅट कमिन्सने त्याची बेस प्राईस २ कोटी रुपये ठेवली होती. त्याला आपल्या संघात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात चुरस पाहायला मिळाली. अर्थात अष्टपैलू पॅट कमिन्स संघात आला की संघाची बाजू आणखी मजबूत होईल. त्यामुळे फ्रेंचायसींनी आपला खजाना रिता करण्यासाठी मागेपुढे पाहिले नाही. पॅट कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने दहापट जास्त रक्कम मोजली.
बेस प्राईस २ कोटी असताना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस निर्माण झाली. ही रक्कम १२ कोटींवर गेली तेव्हा सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये चुरस निर्माण झाली. ही रक्कम पाहता पाहता १७ कोटींच्या घरात गेली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने एन्ट्री घेतली मात्र २०.५० कोटी रुपये मोजून सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली. पॅट कमिन्सपूर्वी इंग्लंडच्या सॅम करनला १८.५०कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे पॅट कमिन्स आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
पॅट कमिन्स आतापर्यंत ४२ आयपीएल सामने खेळला आहे. मागच्या वर्षी आयसीसी स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून त्याने माघार घेतली होती. आतापर्यंत ४२ पैकी ३१ सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली. त्याने ३७९ धावा केल्या. तर ४५ गडी बाद केले आहेत. सनरायझर्स हैदराबादची बाजू पॅट कमिन्समुळे भक्कम झाली आहे.
अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, मयंक अग्रवाल, मयंक मार्कंडे, नितीश कुमार रेड्डी, राहुल त्रिपाठी, शाहाबाज अहमद. टी. नटराजन, उमरान मलिक, उपेंद्र सिंग यादव, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू सनरायझर्स संघांने कायम ठेवले आहेत