पुणे : भात-तूर डाळीचे वरण आणि त्यावर गावरान तुपाची धार… बस्स पोटोबा तृप्त… तूर डाळीचे आरोग्यासाठी होणारे फायदे लक्षात घेऊन विशेषत: वजन कमी करणा-या तूर डाळीचा जास्त वापर करू लागले आहेत.
मात्र, यंदा महाराष्ट्र व कर्नाटकात तुरीच्या उत्पादनाला फटका बसला असून, नवीन तुरीचे भाव ९२०० प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. शेतक-यांना आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळत असले तरी उत्पादन कमी असल्याने त्याचा किती फायदा बळिराजाला होईल, हे जानेवारीतच कळेल. तोपर्यंत तुरीची आवक वाढेल, नवीन डाळही बाजारात येईल. यंदा उत्पादन कमी असले तरी बाजारात पांढ-या तुरीचा दर्जा चांगला आहे.
कृषि उत्पन्न बाजार समितीत मागील चार दिवसांपासून नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. कृउबा समितीच्या आकडेवारीनुसार सध्या दररोज ४ ते ५ क्विंटल तुरीची आवक होत असून, ७१०० ते ८८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.मात्र, आडत व्याप-यांनी सांगितले की, ७५०० ते ९२०० रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे. ढगाळ वातावरणामुळे नवीन तुरीत ओलसरपणा २० ते ३० टक्क्यांपर्यंत आहे.
नवीन तूर डाळ जानेवारीत येणार बाजारात
खरीप हंगामातील नवीन तुरीची आवक सुरू झाली; पण तूर डाळ बाजारात येण्यास १५ जानेवारीपासून सुरुवात होईल, जालना येथील डाळ मिलमधून तूर डाळ शहरात येईल. जुनी तूर डाळ सध्या १६० रुपये किलोने विकत आहे. नवीन तूर डाळ आल्यानंतर भविष्यातील तेजी-मंदी लक्षात येईल. यंदा ‘एल निनो’ चक्रीवादळामुळे पावसाळा लांबला. लागवड सुमारे ५ टक्क्यांनी घटली.ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने मोठा ताण दिला. परिणामी, फूल आणि शेंगाधारणा कमी झाली. नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने पिकाला मोठा फटका बसला. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात उत्पादन घटले आहे. यामुळे भाव वाढले.