नागपूर : अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे राज्यातील शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई म्हणून देण्यात आलेली रक्कम ही अक्षरश: तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, अशी टीका करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंगळवारी विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन केले.
राज्यातील शेतक-यांवर ओढवलेल्या अस्मानी संकटावर सभागृहात चर्चा झाली. त्यावर सोमवारी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत शेतक-यांना नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र, ही नुकसानभरपाई पुरेशी नसल्याची टीका करत विरोधकांनी सत्ताधा-यांवर निशाणा साधला.
‘महाराष्ट्र शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा की दहशतखोरांचा’, ‘इक्बाल मिर्चीसोबत कुणाचे व्यवहार’, ‘कोणता मंत्री ड्रग माफियाचा साथीदार’, ‘महिला असुरक्षित, तरुण बेरोजगार, झोपा काढतंय हे ट्रिपल इंजिन सरकार’ असे फलक घेऊन विरोधकांनी आंदोलन केले. आंदोलनात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, रवींद्र वायकर, रवींद्र धंगेकर आदींची उपस्थिती होती.
- भाजप दुटप्पी भूमिका मांडतेय
भाजप दहशतवादाच्या मुद्यावर दुटप्पी भूमिका घेत आहे. आम्ही पुरावे देऊनही त्याची दखल घेत नाही. मात्र, त्यांच्या आमदारांनी माहिती देताच ते चौकशी लावतात. या भूमिकेच्या विरोधात आम्ही आंदोलन केले, असे अंबादास दानवे म्हणाले.