नवी दिल्ली : गलवान खो-यात जून २०२० मध्ये भारत आणि चीन सैन्यात मोठी चकमक झाली होती. ही ४० वर्षांतील सर्वात प्राणघातक चकमक मानली जाते. यावरुन देशात आरोप-प्रत्यारोपही झाले होते, यावर आता तत्कालीन लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी मोठा खुलासा केला आहे.
तत्कालीन लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी आपल्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे. पूर्व लडाखमधील एलएसीवर चिनी सैन्याने रणगाडे घेऊन पुढे जाण्यास सुरुवात केली होती. गलवान खो-यातील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारने भारतीय लष्कराला फ्री हॅन्ड दिला होता, आणि जे योग्य असेल ते करण्याचे आदेश दिले होते. जनरल एम एम नरवणे यांनी या परिस्थितीचा कसा सामना केला हे त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे.
निवृत्त लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी त्यांच्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्रात ३१ ऑगस्ट २०२० च्या रात्रीचा उल्लेख केला आहे. नरवणेंसाठी ती रात्र सोपी नव्हती, त्या रात्री त्यांना संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि संरक्षण कर्मचारी यांचे सतत फोन येत होते, यामुळे त्यांच्या अडचणी आणखी काही वाढल्या. नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, त्या रात्री मी पहिल्यांदा संरक्षणमंत्र्यांना फोन केला आणि त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधणार असल्याचे सांगितले आणि त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास मला फोन आला. संरक्षणमंत्र्यांनी मला फोन केला.
म्हणाले, मी पंतप्रधानांशी बोललो आहे आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा असे त्यांनी सांगितले. हा लष्करी निर्णय होता. आपल्या आत्मचरित्रात पुढे माजी लष्करप्रमुख म्हणाले, मला अतिशय नाजूक परिस्थितीत टाकण्यात आले होते, जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर होती. मी खोलीत काही वेळ फक्त घड्याळाची टिकटिक ऐकू शकलो आणि मी शांतपणे बसलो. मग एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वत:ला शांत केले.
पहिला गोळीबार होऊ शकत नव्हता
सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिल्यानंतर त्यांनी नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय के जोशी यांना फोन केला मी त्यांना फोन केला आणि आमच्या बाजूने पहिला गोळीबार होऊ शकत नाही, कारण यामुळे चिनी सैन्याला एक निमित्त मिळेल आणि ते पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक होतील असे त्यांना सांगितले. नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, चिनी लष्कराने २९-३० ऑगस्टच्या रात्री मोल्डो येथून पँगॉन्ग त्सो येथील चुनती चांगला भागात आपले सैन्य पाठवले होते. तथापि, ३० तारखेच्या सकाळपर्यंत भारतीय लष्कर स्वत: कैलास पर्वतरांगांवर अतिशय मजबूत स्थितीत होते.