धाराशिव : प्रतिनिधी
बुरखा घालून आलेल्या दोन गि-हाईक महिलांनी ज्वेलर्सच्या दुकानातून २ लाख २५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीची ही घटना धाराशिव शहरातील गवळी गल्ली येथील एस. आर. खाडे ज्वेलर्स या दुकानात घडली. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे दि. १८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील शिक्षक कॉलनी येथे राहणारे सुदाम राजाराम खाडे यांचे गवळी गल्ली येथे एस. आर. खाडे नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात दोन महिला बुरखा घालून आल्या होत्या. त्यांनी या दुकानात काम करणा-या विश्वजीत सुरवसे या कामगाराला स्टॅच्युला घातलेला सोन्याचा राणी हार आवडला आहे, तो दाखवा, असे म्हणाल्या. कामगाराने स्टॅच्युचा हार त्या दोन अनोळखी बुरखाधारी महिलांना दाखवला.
त्या दोन महिलांनी विश्वजीत सुरवसे यांना यातील आणखी दुसरे कानातले, गळ्यातले डिझाईन दाखवा, असे म्हणत बोलण्यात गुंतविले. त्यातील एका महिलेने त्यातील ३३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणी हार टेम्पल असलेला लंपास केला. त्या हाराची किंमत अंदाजे २ लाख २५ हजार रूपये आहे. या प्रकरणी सुदाम खाडे यांनी दि.१८ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे कलम ३७९, ३४ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.