नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१९ डिसेंबर) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहू यांना इस्त्रायल-हमास संघर्ष, संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) जारी केलेल्या निवेदनानुसार, नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांना इस्रायल-हमास संघर्षातील अलीकडील घडामोडींची माहिती दिली. चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी सागरी वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
पीएमओच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांनी प्रभावित लोकसंख्येला सतत मानवतावादी मदत करण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला आहे. संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सर्व ओलीसांच्या सुटकेसह संघर्षाचे लवकर आणि शांततापूर्ण निराकरण करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. कार्यालयाने म्हटले आहे की, समुद्री वाहतुकीच्या सुरक्षेबाबत सामायिक चिंतेसह चालू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षावर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फलदायी विचारांची देवाणघेवाण झाली.