धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील तावरजखेडा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यावर ८ लाख ८४ हजार ५५० रूपयांचा शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार दि. १८ डिसेंबर रोजी ढोकी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच मनिषा दिगंबर फेरे, उपसरपंच तुकाराम नानासाहेब फेरे व ग्रामसेवक विजय नारायण चित्ते यांनी पाणीपुरवठा योजनेचे काम न करताच रक्कम हडप केल्याची खाजगी तक्रार ग्रामस्थ समाधान केशव फेरे यांनी न्यायालयात केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील तावरजखेडा येथील सरपंच मनिषा दिगंबर फेरे, उपसरपंच तुकाराम नानासाहेब फेरे व ग्रामसेवक विजय नारायण चित्ते या तीघांनी दि.१८ ऑगस्ट २०२२ ते दि. १६ जानेवारी २०२३ या कालावधीत शासकीय रकमेचा अपहार केला. आरोपींनी तावरजखेडा गावाला पाणीपुरवठा व इतर सोयी देण्यासाठी आराखडा तयार केला. त्यामध्ये दोन विंधन विहिरी खोदाई, पाण्याचे पाईप, लोखंडी पाईप, बोरमध्ये मोटारी, असे साहित्य न घेता घेतल्या असल्याचे दर्शवून शासकीय रक्कम ८ लाख ८४ हजार ५५० रूपयांचा अपहार केला. काम न करता कागदोपत्री रेकॉर्ड तयार करुन स्वत:च्या फायद्यासाठी शासकीय रक्कम उचलून शासनाची फसवणूक केली.
न्यायालयाच्या कलम १५६ (३) सी. आर. पी. सी प्रमाणे आदेशावरून फिर्यादी समाधान केशव फेरे यांनी दि.१८ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पोलीस ठाणे येथे कलम १६६, ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.