बंगळुरू : कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार यावर्षी इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांच्यासह ६८ जणांना दिला जाणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. राज्य सरकारकडून दरवर्षी दिला जाणारा हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो. १ नोव्हेंबर रोजी राज्याच्या स्थापना दिनानिमित्त हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी यांनी ही घोषणा केली आहे. ते म्हणाले की, म्हैसूर राज्याचे नाव बदलून कर्नाटक केल्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘कर्नाटक संभ्रम’ महोत्सवानिमित्त ६८ राज्योत्सव पुरस्कारांव्यतिरिक्त विविध संस्थांच्या विजेत्यांना दहा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुरस्कार विजेत्यांची निवड करताना प्रत्येक जिल्ह्याला प्रतिनिधित्व देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कार विजेत्यांमध्ये १३ महिला, ५४ पुरुष आणि एका ट्रान्सजेंडरचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांना ५ लाख रुपये रोख आणि २५ ग्रॅम सुवर्णपदक देण्यात येणार आहे. या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रसिद्ध नाट्य कलाकार चिदंबरम राव जांबे, यक्षगान गायिका लीलावती बायपादित्य, अभिनेता ‘बँक’ जनार्द, डिंगरी नागराज, साहित्याचे प्राध्यापक सी नगन्ना, सुब्बू होलियार, पत्रकार दिनेश अमीन मट्टू आणि माया शर्मा यांचा समावेश आहे. बंगळुरूमधील मिथिक सोसायटी आणि शिवमोग्गा येथील कर्नाटक संघ या संस्थांना पुरस्कार मिळाले आहेत.