सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या पथकाने सोमवारी रणदिवेवाडी (ता.माढा) येथील होटेल सह्याद्री धाब्यावर टाकलेल्या धाडीत मा. न्यायालयाने हॉटेल चालकासह दोन मद्यपी ग्राहकांना एकूण सव्वीस हजारांचा दंड ठोठावला.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या पथकाने माढा ते कुर्डुवाडी रोडवर रणदिवेवाडी (ता. माढा) येथील होटेल सह्याद्री ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक प्रमोद दगडू रणदिवे, वय 51 वर्षे हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आल्याने त्याचेसह 2 मद्यपी ग्राहक जितेंद्र दुखीमोची कुमार व फिरोज अब्बास अंसारी यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 2 बाटल्या व प्लास्टिक ग्लास असा चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्ह्यातील तपास अधिकारी विनायक जगताप यांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता मा. सह न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, माढा वाय.एस. आखरे यांनी हॉटेल चालकास रु. पंचवीस हजार द्रव्यदंड ठोठावला तसेच दंडाची रक्कम न भरल्यास 3 महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली.
तसेच दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास सात दिवसांच्या साधी कैदेची शिक्षा सुनावली असता तिन्ही आरोपींनी एकूण सव्वीस हजार दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक किरण बिरादार, दुय्यम निरीक्षक विनायक जगताप, सहायक दुय्यम निरिक्षक जीवन मुंढे, जवान विकास वडमिले, विजयकुमार शेळके व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली.