छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील ८ हजार ४९६ गावांत एकूण ४७.४२ एवढी सरासरी आणेवारी असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यातील खरीप हंगाम २०२३-२४ ची सुधारित आणेवारी घोषित करण्यात आली असून, त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे, मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक १ हजार ६५२ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे.
मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने विभागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मराठवाड्याततील खरीप हंगाम २०२३-२४ ची सुधारित आणेवारी घोषित करण्यात आली असून, ज्यात विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे समोर आले आहे. विभागातील एकूण ५६ लाख १५ हजार १०.६५ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. मात्र, लांबलेल्या पावसामुळे त्यापैकी ५० लाख ९७ हजार ६०६.६२ हेक्टरवर पेरणी झाली. तर ४ लाख ७९ हजार ८६६.६१ क्षेत्र पडीक राहिले आहे. जुलै महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा खरीप हंगामात शेतक-यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.
मराठवाड्यात परिस्थिती गंभीर…
गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणा-या मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नाही. विभागातील आठही जिल्ह्यांत अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. अनेक गावांत पिण्यासाठी पाणी नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यातच आता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी देखील ५० पैशांच्या आतमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेल्या नुकसानभरपाईच्या घोषणेच्या व्यतिरिक्त विशेष दुष्काळी पॅकेज देखील जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.