यवतमाळ : कोणत्याही नात्यात विश्वास अतिशय महत्त्वाचा असतो. पती-पत्नीचे नाते तर संपूर्णपणे प्रेम आणि विश्वासावर चालते. मात्र एकाचाही दुस-यावरचा विश्वास कमी झाला तर सगळंच बिघडू शकते. असाच संशयाचा किडा डोक्यात वळवळल्याने एका पतीने आपली पत्नी, सासरा, दोन मेहुणे अशी चौघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना यवतमाळ येथे घडली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा गावात मंगळवारी रात्री ११ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम पतीने सासरवाडीत जाऊन पत्नीसह चौघांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या घटनेत सासू गंभीर जखमी आहे. गोविंद विरचंद पवार असे आरोपी जावयाचे नाव आहे. पत्नी रेखा गोविंद पवार, सासरा पंडित घोसाळे, मेहुणा ज्ञानेश्वर भोसले आणि सुनील भोसले यांचा मृत्यू झाला आहे. कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने आजूबाजूच्या परिसरात अक्षरश: दहशतीचे वातावरण आहे. आरोपी जावई वीरचंद पवार याला कळंब पोलिसांनी अटक केली आहे.
सासू गंभीर जखमी
दरम्यान पती रात्री ११ च्या सुमारास पत्नीच्या माहेरी पोहचला. जावई पत्नीच्या घरी गेला आणि सासरच्या लोकांवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत पत्नी, दोन मेहुणे, सास-याचा जागीच मृत्यू झाला. तर जावयाच्या हल्ल्यात सासू रुखमा घोसाळे मध्यस्थी करत असताना गंभीर जखमी झाल्या आहेत. सासूला रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंकर कळंब पोलिसांनी आरोपी जावई गोविंद विरचंद पवार याला अटक केली आहे.