दुबई : कतारपाठोपाठ आता सौदी अरेबियातही विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. २०३४ फुटबॉल विश्वचषक यजमानपदाचा दुसरा दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाने केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेच्या २०३४ आवृत्तीचे यजमानपद भूषविण्याचा अन्य दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाने अर्जाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी माघार घेण्याची घोषणा केली. फुटबॉल ऑस्ट्रेलियाच्या प्रशासकीय समितीने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो आहोत की, आम्ही २०३४ च्या स्पर्धेचे आयोजन करण्याचा प्रयत्न करणार नाही.
ऑस्ट्रेलिया २०२६ एएफसी महिला आशिया चषक आणि २०२९ क्लब विश्वचषक आयोजित करण्यास उत्सुक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. २०२६ फुटबॉल विश्वचषक अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. यापूर्वी २०२२ विश्वचषक कतारची राजधानी दोहा येथे आयोजित करण्यात आला होता. असे करणारा कतार हा पश्चिम आशियातील पहिला देश ठरला.