Homeउद्योगभारताने अमेरिकेतील गुंतवणूक २१ टक्क्यांनी घटविली

भारताने अमेरिकेतील गुंतवणूक २१ टक्क्यांनी घटविली

भारताचे अमेरिकेला जशास तसे उत्तर ट्रेझरी बाँडमधील आकडेवारी समोर

न्यू यॉर्क : ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार ३१ ऑक्टोबर २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत भारताने अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक तब्बल २१ टक्क्यांनी कमी केली आहे. ही गुंतवणूक २४१.४ अब्ज डॉलरने कमी होऊन १९०.७ अब्ज डॉलर एवढीच राहिली आहे. गेल्या चार वर्षातील ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये भारताने अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक कमी केली आहे. त्यापूर्वी मात्र ही गुंतवणूक वाढतच चालली होती, मात्र आता टॅरिफनंतर ही गुंतवणूक झपाट्यानं कमी होत आहे.

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते भारताने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, भारत ज्या पद्धतीने ही गुंतवणूक कमी करत आहे आणि इतर गुंतवणुकीचे मार्ग शोधण्यात येत आहेत, यावरून हे दिसून येत आहे की, भारताचे डॉलरवर असलेले अवलंबित्व कमी होत आहे. याची थेट झळ ही अमेरिकेला बसत असून गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या किंमतीमध्ये घट पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भारताने अमेरिकेला आणखी एक धक्का दिला आहे, तो म्हणजे काही देशांसोबत भारताने आता रुपयांमध्ये व्यवहार सुरू केला आहे.

अमेरिकेची चिंता वाढली
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून भारतावर ५० टक्के टॅरिफ लावण्यात आल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात केली होती. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर त्याचा सध्या दोन्ही देशांना देखील फटका बसत असल्याचे दिसून येत आहे, दरम्यान त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५०० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा दबाव असतानाच आता भारताने मोठी खेळी खेळल्याचे समोर आले आहे.

भारत अर्थव्यवस्था मजबूत करणार
टॅरिफ दबावात आपली अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षभरात भारताने अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक झपाट्याने कमी केली आहे. हा अमेरिकेसाठी आणि अमेरिकन चलन असलेल्या डॉलरसाठी मोठा झटका मानला जात आहे, अमेरिकन ट्रेझरी बाँडमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी आता भारताने गुंतवणुकीचे अन्य पर्याय शोधले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR