छत्रपती संभाजीनगर : केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असून, देशभरातील आरोग्य विभाग देखील अलर्ट झाला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने बैठक बोलावत, आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला. तसेच, संपूर्ण यंत्रसामग्री तयार ठेवण्याची सूचना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे.
केरळ राज्यात कोविड-१९ चा नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याअनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक घेण्यात आली.
या बैठकीत, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन यंत्रणा, यंत्रसामुग्री, औषधे, मनुष्यबळ, प्रशिक्षण, संदर्भसेवा, टेलिमेडिसिनच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यात आला. तसेच, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटल व ईओसो पदमपुरा, सिडको एन-११, सिडको एन-८, नेहरू नगर या कोषित सेंटमध्ये रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून घेण्याबाबत आदेश देण्यात आले. या बैठकीत सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे, डॉ. राठोडकर, सर्व आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी जाणि सर्व प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित होते.