नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न भारतीय नागरिक निखिल गुप्ताने केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे, आता याबाबत पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या आरोपाची चौकशी केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. युनायटेड स्टेट्स फेडरल वकिलांनी आरोप सार्वजनिक केल्यानंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिली सार्वजनिक टिप्पणी आहे. पंतप्रधानांनी म्हटले आहे की, ‘काही घटना’ घडल्यामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आणि सर्वात प्रमुख लोकशाही यांच्यातील संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आम्हाला जी माहिती दिली जाईल, त्याची आम्ही नक्कीच चौकशी करू. आमच्या नागरिकांपैकी कोणीही काही चांगले किंवा वाईट केले असेल तर आम्ही त्याची चौकशी करण्यास तयार आहोत. आमची बांधिलकी कायद्याच्या राज्यासाठी आहे. त्यांनी जोर दिला की, ‘काही घटना’ जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आणि सर्वात प्रमुख लोकशाही यांच्यातील संबंध रुळावरून खाली आणू शकत नाहीत.
या आरोपांच्या प्रत्युत्तरात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, भारत अशा प्रकारच्या इनपुटला गांभीर्याने घेतो, कारण ते आमच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हितांवरही परिणाम करतात आणि संबंधित विभाग आधीच या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या घटनेबाबत उच्च स्तरीय चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे.
यूएस अधिकार्यांनी सांगितले होते की, निखिल गुप्ता आणि भारतीय सरकारी कर्मचारी यांनी मे महिन्यापासून फोन आणि ईमेलद्वारे एकमेकांशी वारंवार संपर्क साधला. यादरम्यान सीसी-१ या भारतीय अधिकाऱ्याने हत्येची योजना आखण्यास सांगितले. त्या बदल्यात, निखिल गुप्ताविरुद्ध भारतातील गुन्हेगारी खटला बंद करण्यात मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. दिल्लीत दोघांमध्ये समोरासमोर भेट झाल्याचेही अमेरिकेचे म्हणणे आहे.