32.3 C
Latur
Monday, March 16, 2026
Homeलातूरतुगाव येथे आजपासून कायरं यात्रा महोत्सव

तुगाव येथे आजपासून कायरं यात्रा महोत्सव

मेहकर : प्रतिनिधी
कर्नाटक, महाराष्ट्र व तेलंगना या तीन राज्यात प्रसिध्द असलेल्या भालकी तालुक्यातील तुगांव (हा.) येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मातेची कायरं यात्रा महोत्सवास बुधवार, दि. १४ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. या यात्रा महोत्सवाची मंदिर समिती व ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे.
दर तीन वर्षांनी साजरा होणारा कायरं यात्रा महोत्सव पंचक्रोशीत प्रसिध्द असून, नवसाला पावणारी देवी म्हणून श्री. महालक्ष्मी मातेची ख्याती आहे. कायरं यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, हा महोत्सव सहा दिवसांचा असणार आहे. दि. १४ जानेवारी रोजी हिरडे बसविणे, दि. १५ जानेवारी रोजी श्रींची मंडप पूजा, दि. १६ जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, दि. १७ जानेवारी रोजी श्री महालक्ष्मी मातेची स्वगृहाकडून मंदिराकडे पालखी मिरवणूक, दि. १८ जानेवारी रोजी श्रींची महापूजा व महानैवेद्य, दि. १९ जानेवारी रोजी कोंडा लुटणे व श्री महालक्ष्मी मातेची मंदिराकडून स्वगृहाकडे पालखी मिरवणूक आदींसह धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच या यात्रा महोत्सवामध्ये पोतराजाचा कार्यक्रम, आराधी, भारुडे अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेमध्ये आकाशी पाळणा, मौत का कुँआ, हिराबाई डोंगरे नोकनाट्य मंडळ, ३ (श्री) डान्स यांसह व्यावसायिक भांडी दुकाने, खेळांची दुकाने, कापड दुकाने, जिलेबी दुकाने, स्टेशनरी सारखे अनेक दुकाने थाटली जाणार आहेत. यात्रा महोत्सवानिमित्त गावातील मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याने संपूर्ण गाव उजळून निघाले आहे. यासोबतच, यात्रेमध्ये गैरव्यवहार होऊ नये म्हणून यंदा प्रथमच स्कॅनरद्वारे देणगी या उपक्रमाचा वापर करण्यात आला असून या उपक्रमाची सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच संपूर्ण यात्रा महोत्सवामध्ये कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायरं यात्रा महोत्सवाचा भाविक-भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजकुमार पाटील व सर्व सदस्यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR