नवी दिल्ली : संसदेत विरोधी खासदारांच्या निलंबनाची मालिका बुधवारीही सुरूच आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून आणखी दोन खासदारांना निलंबित केले आहे. आतापर्यंत हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहातून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या १४३ वर पोहोचली आहे.
फौजदारी कायद्यांशी संबंधित तीन विधेयकांवरील चर्चेदरम्यान, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सी. थॉमस आणि एएम आरिफ या दोन विरोधी सदस्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. जे सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केले. आरिफ हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) खासदार आहेत आणि सी. थॉमस केरळ काँग्रेसचे खासदार आहेत.
लोकसभेत फलक दाखवून सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी आणखी दोन विरोधी सदस्यांना संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण ९७ लोकसभा सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. याआधी गेल्या आठवड्यात गुरुवारी १३, सोमवारी ३३ आणि मंगळवारी ४९ सदस्यांना निलंबित करण्यात आले होते.