धाराशिव : धाराशिव येथील तुळजाभवानी मातेचा बहुचर्चित प्राचीन व मौल्यवान अलंकार गायब प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण सात लोकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सात पैकी पाच जण मयत आहेत. तुळजाभवानी मातेच्या अलंकार चोरी प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात पाहायला मिळाले होते. त्यामुळे अखेर या प्रकरणात पोलिस अॅक्शन मोडवर आले असून, पोलिसांनी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल केले आहेत.
धाराशिव येथील तुळजाभवानी मातेचा बहुचर्चित प्राचीन व मौल्यवान अलंकार चोरी प्रकरण विधिमंडळात उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर सहा दिवसांनी पोलिसांनी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. विशेष म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सात पैकी पाच जण मयत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून मयत लोकांवर गुन्हे दाखल करून काय साध्या होणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तुळजाभवानी मातेचे प्राचीन व मौल्यवान अलंकार गायब प्रकरणी आमदार महादेव जानकर यांनी सोमवार विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. श्री तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट व इतर दागिने गहाळ झाले आहेत, या प्रकरणी कारवाईची त्यांनी मागणी केली होती. यावर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी तत्परतेने शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधले होते. तसेच, या सर्व प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी तक्रार देऊनही अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगितले.
त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश नीलम गो-हे यांनी दिले होते. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कारवाई करण्यात येईल, असे सभागृहात सांगितले होते. त्यानंतर अखेर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, तुळजाभवानी मातेचा प्राचीन व मौल्यवान अलंकार गहाळ झाल्या प्रकरणात मंदिराचे व्यवस्थापक तहसीलदार सोमनाथ माळी यांनी १३ डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.