चेन्नई : या महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला शक्तिशाली चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता. तामिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलय पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किमान दहा जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ग्रामीण भागात आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने १२ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले आहे. तामिळनाडूचा मोठा भाग पाण्याखाली गेला असून तेथे अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथक बोटींचा वापर करत आहेत.
या वर्षी तामिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा २० पट जास्त पाऊस झाला आहे. तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी पाणी साचले आहे. परंतु तिरुनेलवेली आणि थुथुकुडीमध्ये परिस्थिती सर्वात वाईट आहे. तसेच तामिळनाडूत मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेवरही होत आहे. मुसळधार पावसामुळे दक्षिण रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. या सर्व भागात मदतकार्य सुरू आहे. सततच्या पावसामुळे तिरुनेलवेली जिल्ह्यात मणिमुथर धबधबा कोसळला आहे. त्याचवेळी ओटापीदारमजवळील मदुराईला जाणारा लिंक रोड पूर्णपणे तुटला आहे.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सांगितले की, काही ठिकाणी १८७१ नंतर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तिरुनेलवेली आणि थुथुकुडी जिल्ह्यांतील सुमारे ४० लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. सध्या भारतीय हवाई दलाची ४ हेलिकॉप्टर आणि नौदल-तटरक्षक दलाची प्रत्येकी २ हेलिकॉप्टर बचावकार्यात तैनात करण्यात आली आहेत.