मुंबई : टीव्ही विश्वातील लोकप्रिय शो ‘बिग बॉस’चा सध्या १७ वा सीझन सुरू आहे. एकीकडे हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे तर दुसरीकडे या सीझनवर खूप टीका केली जात आहे. मात्र आता घरातील दुसरी सर्वांत लोकप्रिय जोडी अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे चर्चेत आले आहेत. घरात गेल्यापासून दोघांमध्ये खूपच भांडणं होत आहेत. आता पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यामुळे दोघांचे नाते जास्त दिवस टिकेल की नाही यावर नेटकरी सोशल मीडियावर कमेंटस् करत आहेत.
दरम्यान, घरातील वैयक्तिक आयुष्याचा तमाशा सुरू असल्याचे अनेक नेटक-यांचे म्हणणे आहे.
त्यातच आता मुनव्वर फारुकी देखील यंदाच्या आठवड्यात खूपच चर्चेत आला. त्याच्या दोन गर्लफ्रेंडनी त्याच्यावर अनेक आरोप केले होते. आयशा खानने विकीला त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचारले अन् विकीने त्याला विनोदी उत्तर दिले आणि तिला विवाहित पुरुषांना खूप त्रास असतो असे सांगितले.
हे ऐकल्यानंतर अंकिता चिडली आणि तिने विकीला असं बोलण्यामागचे कारण विचारले. याला उत्तर देताना विकी म्हणाला, मला कसे वाटत आहे हे मी कधीच सांगू शकत नाही की विवाहित लोक, विशेषत: पुरुष या परिस्थितीतून जात असतात. ते कधीच सांगू शकत नाहीत की ते कोणत्या परिस्थितीतून जातात आणि काय सहन करतात.
हे ऐकल्यानंतर अंकिता आणखीनच भडकते आणि रागाने विकीला घटस्फोटासाठी विचारते, ‘तुला एवढा त्रास होत असेल तर तू माझ्यासोबत का आहेस? चल घटस्फोट घेऊ, मला तुझ्याबरोबर घरी परत जायचे नाही.’
नंतर अंकिता आयशासोबत तिच्या आणि विकीच्या नात्याबद्दल बोलताना म्हणते की, मला माहीत आहे की विकी माझ्यावर प्रेम करतो पण तो मला जे हवे आहे ते कधीच देत नाही. तो माझ्यावर कंट्रोल करतो असे मला वाटते. मी पाहिले आहे की, जेव्हा मी इतर पुरुष स्पर्धकासोबत भांडते तेव्हा तो मला थांबवत असतो. सध्या अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची सोशल मिडियावर खुपच चर्चा आहे. नेटकरी त्यांना या शो मधून बाहेर पडून आपले नाते वाचवण्यचा सल्ला देत आहेत. तर अनेकांनी अंकिताला पाठिंबा दिला आहे.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी डिसेंबर २०२१मध्ये लग्न केले. या दोघांनी यावर्षी ऑक्टोबरमध्ये बिग बॉस १७ च्या घरात प्रवेश केला होता. ‘बिग बॉस’च्या घरात नेहमी दोघे भांडण करताना दिसतात. आता ‘बिग बॉस’च्या घरात त्यांचे नाते घट्ट होते की तुटते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.