18.1 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeराष्ट्रीयलोकसभेतून आणखी ३ विरोधी खासदार निलंबित

लोकसभेतून आणखी ३ विरोधी खासदार निलंबित

नवी दिल्ली : सभागृहाचा अवमान केल्याच्या आरोपावरून गुरुवारी आणखी तीन खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस खासदार नकुल नाथ, डीके सुरेश आणि दीपक बैज यांना चालू हिवाळी अधिवेशनातून निलंबित केले. त्यामुळे निलंबित खासदारांची संख्या १४६ झाली आहे. यापैकी एकूण १०० खासदार लोकसभेतील आहेत. संसदेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केल्यानंतर १४ डिसेंबरपासून खासदारांच्या निलंबनाची मालिका सुरूच आहे.

प्रश्नोत्तराचा तास संपताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तिन्ही खासदारांची नावे घेतली आणि तुम्ही सभागृहाचे कामकाज वारंवार विस्कळीत करत आहात, फलक दाखवत आहात, घोषणाबाजी करत आहात, कागदपत्रे फाडत आहात. हे सभागृहाच्या शिष्टाचाराच्या विरोधात आहे, असे त्यांनी म्हटले. घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी सदस्यांना सभापती म्हणाले की, मला कोणत्याही सदस्याला विनाकारण निलंबित करायचे नाही. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. तुम्हाला इथे चर्चा करण्याचा आणि तुमचे मत मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही लोक तुमच्या जागेवर जा, मी तुम्हाला शून्य तासात तुमचे मत मांडण्याची संधी देईन.

सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी लोकसभेतून १४ डिसेंबरला १३ विरोधी सदस्य, १८ डिसेंबरला ३३, १९ डिसेंबरला ४९ आणि २० डिसेंबरला दोन सदस्यांना निलंबित करण्यात आले. त्याचवेळी १४ डिसेंबरला राज्यसभेतून ४५ आणि १८ डिसेंबरला ४५ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. या निलंबनाविरोधात विरोधी पक्षांनी गुरुवारी दिल्लीतील विजय चौकात मोर्चा काढून सरकारवर हुकूमशाहीचा आरोप केला.नियोजित तारखेनुसार, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा कामकाजाचा दिवस शुक्रवारी (२२ डिसेंबर) आहे. आज (गुरुवारी) सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR