25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रजरांगेंच्या सभेपूर्वी बीडमधील आंदोलकांना पोलिसांची नोटीस

जरांगेंच्या सभेपूर्वी बीडमधील आंदोलकांना पोलिसांची नोटीस

बीड : मनोज जरांगे पाटील यांची बीड शहरात २३ डिसेंबर रोजी निर्णायक इशारा सभा होत असून, याच सभेच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांकडून १२५ मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. सोबतच जाळपोळ आणि दगडफेकीत जामीन मिळालेल्या आंदोलकांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे जरांगे यांच्या सभेपूर्वी बीड पोलिस अ‍ॅक्शन मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

२३ डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये निर्णायक इशारा सभा होणार असून, याच सभेपूर्वी बीड पोलिसांनी १२५ मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवल्या आहेत. यामध्ये बीडमध्ये जी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती, याप्रकरणी जामीन मिळालेल्या आंदोलकांना देखील नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ४०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, सभेमध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून १२५ मराठा आंदोलकांना देखील नोटिसा बजावल्या आहेत. तर, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना कायद्याने दिलेल्या अधिकाराप्रमाणेच आंदोलन करून कायदा व सुव्यवस्था राखावी असे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहेत. तर, वैयक्तिक किंवा शासकीय मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेण्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सभास्थळाची पाहणी
२३ डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा होणार असून, बीड बायपास रोडवर या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याच सभास्थळाची पाहणी छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केली आहे. यावेळी बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी सभेच्या ठिकाणी असलेल्या नियोजनाची आयोजकांकडून माहिती जाणून घेतली.

आयोजकांना दिल्या सूचना…
सभेला येणारे मराठा बांधव आणि इतर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याचबरोबर धुळे-सोलापूर या महामार्गाच्या बाजूलाच ही सभा होणार असल्याने, महामार्गावरची वाहतूक देखील वळवण्यात आली आहे. मात्र, महत्त्वाच्या वाहनांना या मार्गावरून जाता येणार आहे. त्यामुळे, त्यांना देखील काही त्रास होणार नाही अशा सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सभेच्या आयोजकांना दिल्या आहेत. तसेच, सभेसाठी बीडसह बाहेर जिल्ह्यातील पोलिस देखील बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले आहेत. तर, सभेदरम्यान उपद्रवी लोकांवर पोलिसांची नजर असल्याची माहिती ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR