24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रसनी साळवेच्या चार मारेक-यांना दुहेरी जन्मठेप

सनी साळवेच्या चार मारेक-यांना दुहेरी जन्मठेप

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत जन्मठेपेच्या शिक्षेची राज्यातील पहिलीच घटना

धुळे : धुळे शहरात एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या हत्ये प्रकरणातील चार आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. धुळे जिल्हा न्यायालयाने आज या प्रकरणात निकाल दिला. सनी साळवे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.

धुळे शहरात १८ एप्रिल २०१८ रोजी देवपुरात असलेल्या नरसिंह बीअर बारजवळ गाडीला कट मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. सनी साळवे, सुमेध सूर्यवंशी आणि सागर साळवे यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर जखमी उपचारांसाठी रुग्णालयात गेल्यानंतरही त्यांना आरोपींनी त्या ठिकाणी जाऊन मारहाण करत धमकावण्याचा प्रयत्न केला. आरोपींच्या मारहाणीत सनी साळवे या १५वर्षीय शालेय विद्यार्थ्याची हत्या झाली होती.

सनी साळवेच्या हत्ये प्रकरणी धुळे सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. न्यायाधीश डी. एम. अहिरे यांनी या हत्ये प्रकरणी दिलेल्या निकालात यातील चार आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेतील आठ आरोपींपैकी चार जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून उर्वरित तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे. दीपक फुलपगारे, जितेंद्र फुलपगारे, गुड्या ऊर्फ मयुर फुलपगारे आणि वैभव गवळे या आरोपींना दुहेरी शिक्षा सुनावण्यात आली. तर, प्रशांत ऊर्फ भैया बाविस्कर, दीपक ऊर्फ सनी सानप आणि गोपाल चौधरी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सनीच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर
विशेष म्हणजे या प्रकरणात जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशा पद्धतीने शिक्षा सुनावण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. या निकालानंतर सनी साळवे यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. सनीच्या कुटुंबीयांनी कोर्टाच्या निकालावर समाधान व्यक्त केले. सनी साळवे हत्या प्रकरणी काय निकाल लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR