नवी दिल्ली : लोकसभेचे कामकाज गुरुवारी (२१ डिसेंबर) अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. विशेष म्हणजे, संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवारपर्यंत (२२ डिसेंबर) चालणार होते. लोकसभेचे कामकाज नियोजित वेळेच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी तहकूब करण्यात आले. अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू झाले होते. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी सभागृहात सांगितले की, या अधिवेशनात सुमारे ७४ टक्के कामकाज झाले असून १८ विधायक मंजूर करण्यात आली.
ते म्हणाले की, लोकसभेत कामाची उत्पादकता ७४ टक्के आहे. यासाठी १४ बैठका झाल्या. ही बैठक ६१ तास ५० मिनिटे चालली. या कालावधीत १२ विधेयके मांडण्यात आली आणि एकूण १८ विधेयके चर्चेनंतर मंजूर करण्यात आली. या कालावधीत लोकसभेच्या विविध विभागांशी संबंधित स्थायी समित्यांनी ३५ अहवाल सादर केले. याशिवाय खासदारांनी शून्य तासात सार्वजनिक महत्त्वाचे १८२ तातडीचे मुद्दे उपस्थित केले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात म्हणजेच १३ डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेबाबत मोठी चूक समोर आली होती. या संदर्भात विरोधी पक्षांनी सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली आणि त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. या हिवाळी अधिवेशनात तब्बल १४६ खासदारांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. यापैकी एकूण १०० खासदार लोकसभेतील आहेत.