नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्लूसी) गुरुवारी बैठक झाली. यावेळी, जागावाटपाबाबत पक्षाच्या योजना आणि आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणूक दूर नाही, कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी करावी.
तसेच भारत जोडो यात्रेवर बोलताना खर्गे म्हणाले की, काँग्रेसशी संबंधित लोकांची इच्छा आहे की राहुल गांधींनी पुन्हा भारत जोडो यात्रा पूर्वेकडून पश्चिमेकडे करावी, अंतिम निर्णय त्यांच्यावर अवलंबून आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपशी स्पर्धा करण्याच्या नव्या अजेंड्यावर चर्चा करण्यात आली. त्याचवेळी सोनिया गांधी यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीचे निकाल निराशाजनक आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मेहनत घेण्याचे त्यांनी आवाहन केले. काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार असून पक्ष आणि इंडिया ब्लॉकचे सदस्य म्हणून आम्हाला आमचे काम पूर्ण करायचे आहे, असेही त्या म्हणाल्या. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त २८ डिसेंबरला काँग्रेसची नागपुरात मेगा रॅलीही होणार आहे.