24.5 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरलोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांचे निधन

लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांचे निधन

छत्रपती संभाजीनगर : लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे (वय ९०) यांचे गुरुवारी सायंकाळी अहमदनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर नगर येथे शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विद्यार्थीप्रिय शिक्षक, लोकसाहित्य संशोधक, समीक्षक आणि व्यासंगी वक्ते अशी त्यांची चौफेर ओळख होती.

परंपरा म्हणजे बुरसटलेपण नसून स्थानिक भूमीचे संचित असल्याचा अभ्यासपूर्ण प्रतिवाद करणाऱ्या लोकसाहित्य अभ्यासकांत डॉ. प्रभाकर मांडे अग्रणी होते. सहा दशकांपासून अध्यापन आणि संशोधनात मांडे यांचा दबदबा होता. सावखेडा (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे १६ डिसेंबर १९३३ रोजी मांडे यांचा जन्म झाला होता. मांडे यांचे शिक्षण हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात झाले होते. शिक्षक असताना त्यांनी कन्नड तालुक्यातील लोकसाहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन करून पीएच. डी. पदवी मिळवली होती. या प्रबंधावरील कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे.

परभणी येथील शिवाजी महाविद्यालयात अध्यापन करीत असतानाच १९७३ मध्ये ते तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात अध्यापक म्हणून रूजू झाले होते. विद्यापीठात १९९३ पर्यंत कार्यरत असताना मांडे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. सहजसोप्या पद्धतीने साहित्य आणि समीक्षा शिकवत असत. समीक्षा हा रूक्ष विषयही त्यांनी चिकित्सक पद्धतीने शिकवत विद्यार्थ्यांची पिढी घडविली. त्यांच्या मार्गदर्शनात एकवीस विद्यार्थ्यांनी पीएच. डी. संशोधन केले. मांडे यांचा लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोकजीवन क्षेत्रातील संशोधनामुळे राज्यभर दबदबा होता.

डॉ. प्रभाकर मांडे आणि मी कॉलेजपासून सहाध्यायी होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते उशिरा आले. त्यांनी दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी केल्या. एक म्हणजे लोकसाहित्याचे सिद्धांत मराठीत मांडले आणि महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या जीवन पद्धतीचे संशोधन केले. काही भटक्या जातींच्या स्वतंत्र भाषांची उकल केली. हे त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. मध्ययुगीन संत साहित्याच्या दुर्मीळ पोथ्या गोळा करुन त्यानी मौलिक ग्रंथशाळा उभारली होती.

लोकसाहित्य संशोधनाला व्यापक करण्यासाठी त्यांनी लोकसाहित्य परिषद स्थापन करुन समकालीन संशोधकांसह चळवळ राबविली. लोकसंस्कृतीवर चिकित्सक लिखाण करीत व्याख्यानेही दिली होती. उपासनाप्रधान व रंजनप्रधान लोकगायकी परंपरेची विस्तृत मांडणी केली. त्यामुळे मराठवाड्यातील लोकपरंपरा पहिल्यांदाच अभ्यासल्या गेल्या. २००७ मध्ये झालेल्या उंडणगाव येथील मराठवाडा साहित्य संमेलनाचे मांडे अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. लोकसाहित्यातील संशोधनासाठी केंद्र सरकारने डॉ. प्रभाकर मांडे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. मागील काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथून ते अहमदनगर येथे वास्तव्यास गेले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR