25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरमृत संचालकांच्या वारसांनी मागीतली मुदतवाढ

मृत संचालकांच्या वारसांनी मागीतली मुदतवाढ

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहारानंतर तत्कालीन संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधितांना दोषारोपपत्र पाठविण्यात आले आहे. या दोषारोपपत्रात मृत १४ माजी संचालकांच्या २८ वारसदारांचाही समावेश आहे. त्यातील मृत तीन संचालकांच्या वारसांनी सुनावणीसाठी हजेरी लावली. पण, आपले म्हणणे मांडण्यासाठी आम्हाला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी स्वत: तसेच वकिलांच्या माध्यमातून केली आहे.

माजी आमदार भाई एस. एम. पाटील यांचे दोन वारस, बाळासाहेब पाटील आणि अनिल पाटील, माजी संचालक सुभाष बहिर्जे यांचे दोन वारस विनोद बहिर्जे व प्रमोद बहिर्जे, मृत संचालक माजी आमदार बाबूरावअण्णा चाकोते यांच्या तीन वारसांनी सुनावणीसाठी हजेरी लावल. पण, म्हणणे सादर करण्यासाठी त्यांनी मुदत वाढवून मागितली आहे. संबंधित माजी संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सहकार कायदा कलम ८८ अन्वये जबाबदारी निश्‍चित करून त्यांना दोषारोप पत्र पाठविण्यात आले आहे. त्या दोषारोप पत्रावर संबंधित संचालक, मृतांच्या वारसांना आपली भूमिका मांडण्याची संधी सध्या देण्यात येत आहे.

माजी संचालक प्रकाश पाटील, माजी सरव्यवस्थापक किसन मोटे, माजी सेवक संचालक सुभाष भोसले यांनीही चौकशी अधिकारी तथा निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांच्यापुढे सुनावणीसाठी हजेरी लावली. दरम्यान, दोषारोप पत्रे पाठविण्यात आल्यानंतर सुनावणीला वेग आला आहे. डॉ. तोष्णीवाल यांच्या समोर दोषापत्रावर संबंधित आपले म्हणणे सादर करत आहेत. सध्या आठवड्याला सुनावणी होत आहेत. येत्या चार जानेवारी रोजी या प्रकरणाची पुढची सुनावणी असणार आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक घेण्यासंदर्भात न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्या याचिकेवरही सध्या सुनावणी सुरू आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक घेण्याबाबत ३१ डिसेंबरनंतर सूचना केली जाईल, असे पत्र राज्य सरकारने सादर केले आहे. नव्या वर्षात जिल्हा बँकेच्या या सर्व घडामोडी महत्वाच्या ठरणार आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR