नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत देशभरात वाघांच्या हल्ल्यात ३०२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र यापैकी ५५ टक्क्यांहून अधिक मृत्यू एकाच राज्यातील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. आकडेवारीनुसार, केंद्राने पीडितांच्या कुटुंबीयांना २९.५७ कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून वितरित केले आहेत. सरकारने या आठवड्याच्या सुरुवातीला लोकसभेला सांगितले की २०२२ मध्ये वाघांच्या हल्ल्यात ११२ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०२१ मध्ये ५९, २०२० मध्ये ५१, २०१९ मध्ये ४९ आणि २०१८ मध्ये ३१ लोक मारले गेले होते.
गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत वाघांच्या हल्ल्यात एकट्या महाराष्ट्रात १७० मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात २०२२ मध्ये वाघांच्या हल्ल्यात ८५, २०२१ मध्ये ३२, २०२० मध्ये २५, २०१९ मध्ये २६ आणि २०१८ मध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात गेल्या पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०२२ आणि २०२१ मध्ये प्रत्येकी ११, २०२० मध्ये चार, २०१९ मध्ये आठ आणि २०१८ मध्ये पाच जणांचा वाघांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाला.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे, मात्र गेल्या काही वर्षांत ही संख्या सातत्याने कमी होत आहे. पश्चिम बंगालमध्ये २०१८ मध्ये वाघांच्या हल्ल्यात १५ लोकांचा मृत्यू झाला होता, परंतु २०२२ मध्ये ही संख्या केवळ एकावर आली आहे. बिहारमध्ये मात्र वाघांच्या हल्ल्यांशी संबंधित मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बिहारमध्ये २०१९ मध्ये वाघाच्या हल्ल्यात कोणीही मरण पावले नाही, परंतु २०२० मध्ये एका व्यक्तीला, २०२१ मध्ये चार आणि २०२२ मध्ये नऊ जणांना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे.