Homeमहाराष्ट्रसरकारमध्ये गँगवार, भोंदूूगिरी, भ्रष्टाचाराच्या विळख्यात महाराष्ट्र

सरकारमध्ये गँगवार, भोंदूूगिरी, भ्रष्टाचाराच्या विळख्यात महाराष्ट्र

विजय वडेट्टीवार यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांवरील वाढते अत्याचार, ड्रग्जचा विळखा आणि फोफावलेली भोंदूगिरी यावरून काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राची मान आज या सरकारमुळे खाली गेली असून राज्यात लोकशाहीची हत्या होत आहे अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यात अशोक खरात सारखे भोंदू महिलांवर बलात्कार करत आहेत. खरातने नाशिक कुंभमेळा रिंगरोड प्रकल्पातील जागा आधीच विकत घेतली. याचा अर्थ त्याला अधिका-यांची साथ आहे. त्यांनी माहिती दिली म्हणून नेमकी जागा विकत घेतली. या प्रकरणात आयपीएस, आयएएस आणि महसूल खात्यातील अधिका-यांची चौकशी झाली पाहिजे. लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेऊन खरातने संपत्ती कमावली असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. जादूटोणा विरोधी कायदा होऊन १२ वर्षे झाली, तरी अद्याप त्याची कडक नियमावली तयार झालेली नाही.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या कायद्यासाठी संघर्ष केला होता. राज्यात भोंदू बाबांकडून महिलांचे शोषण होत आहे. या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली असती, वेळेत नियमावली झाली असती, तर हे भोंदू बाबा जन्माला आले नसते,असे वडेट्टीवार म्हणाले. खरात सापडला पण सहावीत शिकणा-या मुलीवर अ‍ॅसिड हल्ला करणारा आरोपी अजून सापडला नाही, पोलिस काय काम करतात? संगमनेर येथील १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करणा-या कीर्तनकाराला त्यांनी कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात पोलिसांवर दबाव टाकला जात असून गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेतील मंत्रीच जर आम्हाला पोलिसांनी मारले अस सांगत असतील तर राज्यात गँगवॉर सुरू आहे. मंत्र्यांच्या कॉलरला पोलिस हात घालत असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे? स्वाभिमान आता तर मंर्त्यांनी राजीनामा दिला असता. अंतरवली सराटी मध्ये लाठीचार्ज करणारा आणि मंर्त्यांना मारणारे पोलिस अधिकारी एकच आहे पण कारवाई होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. साता-यातील यशवंतराव चव्हाणांच्या भूमीत झालेली गुंडगिरी निंदनीय असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये २३% वाढ झाली असून २०२५ मध्ये गुन्ह्यांचा आकडा १ लाख ८ हजारांवर पोहोचला आहे. ठाणे-पालघर भागात गरीब महिलांना आमिष दाखवून त्यांचे शोषण करणारे ‘स्त्री-बीज रॅकेट’ सक्रिय असताना गृह विभाग काय करत होता? असा प्रश्न त्यांनी विचारला. पुणे, मुंबई आणि नागपूरसारखी शहरे ड्रग्जच्या विळख्यात आहेत. नवीन प्रकारचा हायड्रोपोनिक गांजा आता गॅलरीत आणि एसी वातावरणात पिकवला जात असून, सुशिक्षित तरुण इझी मनीसाठी या गुन्हेगारीकडे वळत आहेत. सरकारचे यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले. राज्यात एकीकडे गुन्हेगारी वाढत आहे दुसरीकडे भ्रष्टाचाराने राज्य बरबटले आहे.

शिक्षण विभागातील १५६ कोटींचे गणवेश टेंडर असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमधील ३५% कमिशनचा विषय असो, सरकार केवळ पैसे कमावण्यात मग्न आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर गुन्हेगारांना क्लीन चिट दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारमधील एक आमदार ३५ टक्के कमिशन कार्यकर्त्यांना दिल्याचे सांगतो. हे कमिशन देते कोण? राज्यात ३५ टक्के कमिशनखोरी सुरू असल्याचे आमदार मान्य करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी अंतिम आठवडा भाषणात केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR