छैबासा : झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात बंदी घातलेल्या भाकप (माओवादी) संघटनेच्या नक्षलवाद्यांनी लोहमार्गाचा भाग स्फोटात उडवून दिला. त्यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली. किमान १३ रेल्वे रद्द कराव्या लागल्या तसेच एका रेल्वेचा मार्ग बदलावा लागला.
गोयलकेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. पश्चिम सिंगभूमचे पोलिस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याची राजधानी रांचीपासून अंदाजे १५० किमी अंतरावर असलेल्या गोयलकेरा आणि पोसोईटा रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सकाळपासून रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच रेल्वे सेवा पुन्हा सुरू होईल. माओवाद्यांनी परिसरात बॅनर आणि पोस्टर्सही लावले. त्यामुळे या स्फोटामागे नक्षल्यांचा हात असल्याचे समोर आले. या घटनेने खळबळ उडाली असून, या घटनेनंतर लगेचच पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. मात्र, अद्याप नक्षल्यांचा सुगावा लागलेला नाही. दरम्यान, या घटनेमुळे राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.