25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रबीडच्या सभेसाठी जय्यत तयारी

बीडच्या सभेसाठी जय्यत तयारी

तब्बल २०० जेसीबी, १० रुग्णवाहिका, १५०० पोलिस

बीड : बीडमध्ये मनोज जरांगे यांची आज निर्णायक इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, याच इशारा सभेपूर्वी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होईल. तर, याच रॅलीवर दोनशे जेसीबींतून मनोज जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. साधारण तीन ते चार तास चालणा-या या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत होणार आहे. यासोबतच, जेसीबीमधून मनोज जरांगे यांच्या रॅलीवर पुष्पवृष्टी करण्याची तयारी करण्यात आली आहे. सोबतच, १५०० पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त देखील सभेसाठी तैनात करण्यात आला आहे.
मनोज जरांगे यांची आज बीड शहरात निर्णायक इशारा सभा होत आहे. याच सभेतून मनोज जरांगे २४ डिसेंबरनंतरच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत. त्यामुळे या सभेला लाखोंची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंधराशेहून अधिक पोलिस असा मोठा बंदोबस्त या सभेच्या निमित्ताने तैनात करण्यात आला आहे. तर, ही निर्णायक सभा वेळेवर होणार असून या सभेसाठी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून समाजबांधव येणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

असा असणार पोलिसांचा बंदोबस्त…
निर्णायक इशारा सभेसाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्यात, १ अप्पर पोलिस अधीक्षक, ४ पोलिस उपअधीक्षक, ८ पोलिस निरीक्षक, ७० पोलिस उपनिरीक्षक, ५६० पोलिस अंमलदार, ६०० होमगार्ड, ५ दंगल नियंत्रक पथक, २ क्यूआरटी पथके, एसआरपीएफचे ३०० जवान असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सभेच्या ठिकाणी व परिसरात १ ड्रोन कॅमेरा व १० वेब कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.

सभेच्या ठिकाणी अशीही तयारी…
सभेच्या ठिकाणी वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी १० रुग्णवाहिका आणि पाटील मैदानाच्या समोरील बिल्डिंगमध्ये उपचार व्यवस्था करण्यात आली असून डॉक्टरांची टीम सज्ज असणार आहे.
सभेच्या ठिकाणी येणा-या लोकांसाठी तीनशे क्विंटल तांदूळ आणि शंभर क्विंटल साबुदाणा खिचडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दोन ट्रक केळी अशी येणा-या लोकांची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १ लाख पाणी बॉटल असतील.
सोबतच २०१ जेसीबीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करून त्यांचे बीड शहरात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

सभेपूर्वी पोलिसांचा बीड शहरात रूट मार्च…
बीड शहरात मनोज जरांगे यांची आज निर्णायक इशारा सभा होणार असून, याच सभेसाठी बीडमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, सभेपूर्वी बीड पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बीड शहरातून रूट मार्च काढला होता. या रूट मार्चमध्ये स्थानिक पोलिसांसह बाहेरून मागवण्यात आलेल्या एसआरपीचे जवान आणि क्यूआरटीचे जवान देखील सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR