बंगळुरू : दक्षिण तामिळनाडूत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहता तिरुनेलवेली जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ६९६ गर्भवती महिलांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. जिल्हाधिर्कायांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत तब्बल १४२ गर्भवती महिलांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींनी मुलांना जन्मही दिला आहे. तथापि, जिल्ह्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्राचे एक पथक तिरुनेलवेली येथे पोहोचले आहे.
सततच्या पावसामुळे भारतीय नौदलाने बचावकार्य सुरू केले आहे. भारतीय नौदलाची सात हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागात उडवण्यात आली, ज्याद्वारे ३.२ टन मदत सामग्री लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. तत्पूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की, पूरस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ते म्हणाले की, आतापर्यंत १२,६५३ लोकांना १४ मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून थुथुकुडी, तिरुनेलवेली, तेनकासी आणि कन्याकुमारी येथे मुसळधार पावसाने कहर केला आहे. बाधित लोकांना वाचवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात मदत आणि बचाव कार्य करत आहेत.