नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय कुस्ती परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात ब्रजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. यानंतर ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात लढणारी भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने तीव्र नाराजी व्यक्त करीत थेट कुस्तीत्याग करीत असल्याची घोषणा केली. त्यानंतर कुस्तीपटूंमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आता बजरंग पुनियानेही नाराजी व्यक्त करीत पद्मश्री परत केला. त्यानंतर विरेंदर सिंहनेही पद्मश्री परत करण्याची तयारी दाखविली आहे. मात्र, या भूमिकेवर भाजपने टीका केली आहे.
भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान बजरंग पुनियाने भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आज आपला पद्मश्री पुरस्कार परत दिला. दरम्यान, या पुरस्कार वापसीनंतर भाजपने आता बजरंग पुनियावर तुफान हल्ला चढवला. मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही एवढे निश्चित. मुजोर कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा तीव्र निषेध, असे ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केले.
दरम्यान, विरेंदर सिंह याने नाराजी व्यक्त करीत पद्मश्री परत करण्याची तयारी दाखविली असून, त्याने सचिन तेंडुलकर आणि नीरज चोप्रा यांना टॅग करत त्यांनाही या प्रकरणी आपला निर्णय देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कुस्तीपटूंवर होणा-या अन्यायाविरोधात नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.