16.4 C
Latur
Friday, November 29, 2024
Homeराष्ट्रीयलोकसभेत विजयासाठी भाजपची ठरली पंचसूत्री

लोकसभेत विजयासाठी भाजपची ठरली पंचसूत्री

बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मंत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीच्या विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंचसूत्रांचा उपयोग करावा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिले. शुक्रवारपासून सुरू असलेल्या बैठकीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवक, शेतकरी, महिला व गरिबांपर्यंत योजना पोचवा, विरोधकांच्या नकारात्मक प्रचाराला सकारात्मक उत्तर द्या, युवकांशी अधिकाधिक संपर्क साधा, डिजिटल व सोशल मीडियाचा आक्रमकपणे उपयोग करा, असे आवाहन केले.

बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महासचिव, राष्ट्रीय पदाधिकारी व राज्यांचे प्रभारी सामील झाले होते. यावेळी जवळपास १६० मतदारसंघांचा प्रामुख्याने आढावा घेण्यात आला. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. परंतु १६० पराभूत झाले होते. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांसह प्रामुख्याने दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपला फारसे यश मिळू शकले नव्हते.

बारामती, चंद्रपूरवर विशेष लक्ष
पराभूत मतदारसंघांमध्ये राज्यातील बारामती, सातारा व चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, सातारामध्ये श्रीनिवास पाटील तर चंद्रपूरमध्ये बाळू धानोरकर विजयी झाले होते. यात भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. या मतदारसंघांमध्ये का पराभव झाला, याची मीमांसा मतदारसंघाच्या निरीक्षकांतर्फे केली जात आहे. पराभूत मतदारसंघांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आढावा घेतला.

‘मिशन ३५० साठी काम करा’: शाह
आगामी लोकसभा निवडणूक आगळीवेगळी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जागतिक स्तरावर मोहोर उमटविली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. यावेळी ३५० पेक्षा एकही कमी जागा चालणार नाही, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR