नवी दिल्ली : भारतीय लष्कराने पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणा-या एका जवानावर कठोर कारवाई केली आहे. लष्कराने या जवानाला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला नोकरीवरूनही बडतर्फ करण्यात आले आहे. दिल्ली कँटमध्ये कोर्टमार्शल केल्यानंतर लष्कराने ही शिक्षा सुनावली आहे. आरोपी जवान नायक रँकचा असून तो राजपुताना रेजिमेंटच्या २२ व्या बटालियनमध्ये होता. सध्या त्याची तैनाती ही राजपुताना रायफल्सच्या रेजिमेंटल सेंटरमध्ये होती. कोर्टमार्शलदरम्यान, आरोपी जवानाने पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेला गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप मान्य केला आहे. तसेच ऑफिशिल सिक्रेट्स अॅक्ट १९२३ अन्वये ठेवण्यात आलेले आरोप मान्य केले आहेत.
रिपोर्टनुसार आरोपी जवानाने आयएसआयला भारतीय लष्कराच्या जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील तैनातीपासून ते युनिटपर्यंतची माहिती दिली होती. त्याशिवाय त्याने त्याच्या आर्मी यूनिटच्या एक्सरसाइजशी संबंधित बरीचशी गोपनीय माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवली होती. तसेच त्याने भारतीय लष्कराच्या वेगवेगळ्या रेजिमेंट्सची मुव्हमेंट, त्यांच्या फॉर्मेशनशी संबंधित माहिती तसेच फोटोग्राफसुद्धा आयएसआयकडे सोपवले होते. एवढंच नाही तर त्याने सर्व कमांडिंग ऑफिसरपासून बॅटल फॉर्मेशन कमांडरपर्यंतची यादी तयार केली होती. त्याने केलेल्या मेसेजमधून त्याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडे या बदल्यात पैशांची मागणी केल्याचे उघड झाले आहे. या जवानावर पहिला आरोप आर्मी अॅक्टमधील सेक्शन ६९ अन्वये ठेवण्यात आला होता. त्यामध्ये आरोपी जवानाने फेब्रुवारी २०१९ आणि एप्रिल २०२० मध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कुठल्यातरी अनोळखी मोबाईल नंबरसोबत संभाषण केले आणि शत्रूला मदत होईल अशी लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवली होती, असे त्यात म्हटले होते.
याचप्रमाणे दुस-या आरोपामध्ये लष्कराची संवेदनशील माहिती गोळा केल्याचा आरोप केला होता. तसेच जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड १ रँकच्या अधिका-याच्या फेक स्टॅम्पपासून ते इतर संवेदनशील वस्तू जप्त करण्यात आल्याचा उल्लेख होता. याशिवाय त्याच्यावर लष्कराच्या नियमांविरुद्ध चेन मार्केटिंग कंपन्यांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला होता.