मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २० जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मुंबईच्या आझाद मैदान आणि शिवाजी पार्कात हे आंदोलन सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी मराठा आंदोलकांनी तयारी सुरू केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्यावेळी राज्यभरातील मराठा समाज हा मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उपोषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या काळातच अयोध्येत राम मंदिराची प्रतिष्ठापना होणार आहे. मात्र, जरांगे हेच आमचे राम आहेत, असे सांगत मराठा आंदोलकांनी मुंबईत येण्याचा निर्धार केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील आता २० जानेवारीला मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार आहेत. त्यांनी त्यांच्या भाषणात दादर शिवाजी पार्क आणि आझाद मैदान या दोन्ही मैदानांचा उल्लेख केला आहे.
पण दादरचे शिवाजी पार्क मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावर अनेक दिग्गजांच्या सभा झाल्या आहेत. त्यामुळे या मैदानात २०जानेवारीला आमरण उपोषण व्हावे याकरता मराठा समाजाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.