बारामती : बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले. त्यांनी अदिती तटकरे यांनी आणलेल्या चौथ्या महिला धोरणाची माहिती दिली. महिला मंत्री असल्यामुळे त्यातील बारकावे अदिती यांना माहित असल्याचे पवार म्हणाले. तसेच या धोरणातील काही माहिती अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी नावात केलेला मोठा बदल सांगितला आहे.
यापुढे अजित अनंतराव पवार असे नाव दिले जायचे मुल जन्माला आल्यानंतर मुलाचे नाव, वडिलांच नाव आणि आडनाव असे असायचे पण आता आपण नविन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलगा असो की मुलगी आधी मुलाचे नाव नंतर आईचे नाव, नंतर वडिलांच आणि पुढे आडनाव अस असणार आहे. कारण शेवटी महिला देखील समाजातील महत्वाचा घटक आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
मी तर अर्थमंत्री या नात्याने सांगतो जर तुम्हाला एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला ६ टक्के कर मात्र महिलेच्या नावावर घेतला तर १ टक्का सवलत आहे. ५० लाखाचं घर असलं तर ५० हजार रुपये वाचतात. यापुढे महिलांनी नवरोबाला सांगावे घर घ्यायचे असेल तर माझ्या नावावर घे, पैसे वाचतील, असे अजित पवार म्हणाले.
मी जेवढे काम करतो तेवढे कोणीच करू शकत नाही,
आपण सरकारमध्ये गेलो त्यामुळे अनेक प्रश्न सुटले आहेत. मी जेवढं काम करतो आहे तेवढे दुसरे कुणी मायका लाल करू शकत नाही. आपले चॅलेंज आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कोणत्याही कामाचे घ्या असेही अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार झाला. त्यानंतर आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत सध्या धरणांमध्ये २० टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पहिले पाणी प्यायला, दुसरे शेतीला आणि तिसरे उद्योगाला पाणी. आधी दुस-यांदा उद्योगाला पाणी देण्याचा निर्णय होता. पण तो निर्णय आम्ही बदलला आणि शेतीला प्राधान्य दिल्याचे अजित पवार म्हणाले.
दिलेल्या संधीचे सोने करा. लग्न पत्रिकेत फक्त प्रेषक म्हणून पदाचे नाव टाकायला उपयोग करू नका, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. मलाही साखर कारखान्याचे काहीही कळत नव्हते. पण अभ्यास केला आणि समजून घेतल्याचे अजित पवार म्हणाले. सगळ्या जाती-धर्माच्या लोकांसोबत काम करा.