अलवर : राजस्थानच्या अलवरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुम हीटर एका कुटुंबासाठी काळ बनून आला आणि पती-पत्नीसह दोन महिन्यांच्या चिमुकलीला आपल्यासोबत घेऊन गेला. साधारण रुम हिटरमुळे एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.
सविस्तर माहिती अशी की, शेखपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुंडाणा गावात राहणा-या दीपकने जयपूरच्या संजना यादवसोबत २ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या घरी एका मुलीचे आगमन झाले होते. थंडी वाढल्यामुळे ते खोलीत हिटर लावून झोपले. रात्री अचानक हिटरला आग लागली. ही आग हळूहळू कपडे आणि नंतर संपूर्ण घरभर पसरली. आरडाओरडा ऐकून गावातील लोक घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत संपूर्ण खोली जळून खाक झाली होती. गावक-यांनी तिघांनाही कसेबसे बाहेर काढले. या घटनेत दीपक आणि त्यांची मुलगी निशिकाचा जागीच मृत्यू झाला, तर महिला ८० टक्क्याहून अधिक भाजली होती. तिला उपचारासाठी अलवर येथील राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.