भोपाळ : मध्य प्रदेश सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तारा झाल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या नवीन सरकारमधील त्यांच्या भूमिकेशी संबंधित एका प्रश्नावर ते म्हणाले की, मी कार्यकर्त्याची भूमिका साकारणार आहे. मंत्रिमंडळ खूप संतुलित आहे. चौहान हे १८ वर्षे मध्य प्रदेश सरकारचे नेतृत्व करत होते. यावेळीही भाजपच्या विजयानंतर तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण अखेर भाजपने मोहन यादव यांच्याकडे कमान सोपवली.
मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रल्हाद पटेल आणि कैलाश विजयवर्गीय या केंद्रीय नेत्यांचाही समावेश केला आहे. या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर कैलाश विजयवर्गीय यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझे भाग्य आहे की मी उमाजी, बाबू लाल गौर, शिवराज सिंह यांच्यासोबत काम केले आणि आता आम्ही मोहन जी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशचा विकास करू. या मंत्रिमंडळात ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांच्या उपस्थितीच्या मुद्द्यावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या संघात कसोटी आणि टी-२० खेळाडू आहेत. अशा स्थितीत अतिशय संतुलित संघ तयार झाला आहे आणि प्रत्येकाला चांगल्या सेवेची संधी मिळेल.