लातूर : प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारे नुकतेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ या आपल्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांचे ‘ट्रिपल ए’ म्हणजेच ऑनलाईन अकॅडमीक अंकेक्षण तपासणी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या प्रक्रियेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चास्कर, प्र कुलगुरू डॉ. अशोक महाजन, सहसंचालक डॉ बाबासाहेब भोसले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. विद्यापीठाच्या अधिकृत परिपत्रकाचा आधार घेऊन जाहीर झालेल्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या ऑडिट निकालात लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा सुवर्णकलश रोवत संपूर्ण विद्यापीठ कार्यक्षेत्रात अव्वल स्थान सिद्ध केले आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातून या ऑनलाईन अकॅडमीक ऑडिट प्रक्रियेमध्ये एकूण ७२ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. विद्यापीठ प्राधिकरणाच्या मान्यतेने जाहीर झालेल्या या गुणांकन पद्धतीमध्ये केवळ अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करणा-या मोजक्याच महाविद्यालयांना सर्वोच्च ‘ओ’ ग्रेड बहुमान प्राप्त झाला आहे.
संपूर्ण ७२ महाविद्यालयांपैकी अवघ्या ५ महाविद्यालयांना हा सर्वोच्च दर्जा प्राप्त करता आला असून, अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची बाब म्हणजे या ५ पैकी तब्बल २ महाविद्यालये एकट्या दयानंद शिक्षण संस्थेची आहेत. संस्थेचे दयानंद कला महाविद्यालय आणि दयानंद विज्ञान महाविद्यालय यांनी आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक, पायाभूत व प्रशासकीय कामकाजच्या जोरावर विद्यापीठात सर्वोच्च ‘ओ’ ग्रेड पटकावला आहे.
या पार्श्वभूमीवर दयानंद शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांनी मिळवलेला सर्वोच्च ‘ओ’ ग्रेड हा शैक्षणिक पारदर्शकतेचा आणि गुणवत्तेचा बालेकिल्ला अधिक मजबूत करणारा ठरला आहे. महाविद्यालयांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व व ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण शैक्षणिक वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संस्थेच्या निरंतर पाठबळामुळे आणि प्रेरणेमुळेच दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन हा बहुमान प्राप्त केला आहे. या यशामुळे दयानंद शिक्षण संस्थेच्या उच्च शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा पुन्हा एकदा महाराष्ट्रात अधोरेखित झाला आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष ललितकुमार शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, विशाल लाहोटी, अॅड. श्रीकांत उटगे, अजिंक्य सोनवणे, संजय बोरा, पदाधिकारी, व्यवस्थापन मंडळ यांच्या खंबीर व दूरदृष्टी नेतृत्वाला तसेच मार्गदर्शनाला जाते.
















