मानवत : असं म्हणतात की, जे विचार, संघटना, उपासना पद्धती काळाच्या कसोटीवर टिकते त्यामध्येच खरी शक्ती असते. या वाक्प्रचारानुसार मानवत येथील दत्त मंदिरात योगानंद सरस्वती यांनी सांगितलेली उपासना पध्दती आजही अव्याहतपणे चालू आहे. संपूर्ण देशभरात दत्त भक्तीचा प्रचार प्रसार करणारे दत्तावतारी सदगुरू वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंब्ये स्वामी यांचे पट्टशिष्य योगानंद महाराज हे गुरुआज्ञेने गुजरात येथून महाराष्ट्रात आले. परभणी जिल्ह्यातील मानवत येथे आले असता त्यांनी येथील आराम मंदिरात दत्तमूर्तीची स्थापना केली. स्वत:च्या कमंडलूमधील दिव्य पाण्याने दत्त पादुकांवर अभिषेक केला. तसेच दैनंदिन पुजेची व वार्षिक उत्सवांची उपासना सांगून स्थानिक दत्त भक्तांकरवी व्यवस्था केली. २०२२ मध्ये या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाले. ही उपासना पद्धती शंभर वर्षांनंतरही अव्याहतपणे चालू आहे.
नुकतेच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. अॅड. अनिरुद्ध पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. यामध्ये भाविक भक्तांसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ध्यान/पारायण कक्ष, पुजारी निवासस्थान, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, स्वयंपाकघर, भव्य प्रसादालय, भक्त निवास यांचा समावेश आहे. युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या माध्यमातून विकास निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
सदगुरू योगानंद महाराज यांच्या हस्ते स्थापन करण्यात आलेले दत्त मंदिर अतिशय जागृत आहे. महाराजानी सांगितल्याप्रमाणे सर्व उपासना आजही चालू असल्यामुळे भाविकांना आध्यात्मिक अनुभूति येते. डॉ. अंकुश लाड यांनी मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे भक्तांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करता आल्या. भाविकांसाठी भविष्यात आणखी सोयीसुविधा निर्माण करण्याचा आमचा मानस आहे, असे अॅड. अनिरुद्ध पांडे यांनी सांगितले आहे.