सोलापूर, –
सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी आरोपी नीलेश झिंबल याचा जामीन अर्ज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी नामंजूर केला. कलबुरगी येथे वास्तव्यास असणारे श्रीशैल बसवणप्पा हदीमनी (सध्या रा. जॉर्जिया, अमेरिका) यांची सरकारी जमीन कमी किंमतीमध्ये घेऊन देतो अशी बतावणी करुन सुमारे साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपी झिंबल याचा देखील सक्रिय सहभाग असल्याबाबत तपास अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यामुळे आरोपीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता. मूळ फिर्यादीचे कुलमुखत्याधारक रेवणसिध्द हिप्परगीतर्फे जामीन अर्जास तीव्र हरकत दाखल करण्यात आली. या सुनावणीच्यावेळी सरकार पक्ष व मूळ फिर्यादीच्यावतीने सदर प्रकरणातील फिर्यादीच्या झालेल्या आर्थिक फसवणुकीबाबतचे कागदोपत्री पुरावा दाखल करुन आरोपीचा सक्रिय सहभाग असल्याबाबतचे पुरावे कोर्टासमोर सादर करुन आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्याचा युक्तिवाद केला. तो युक्तिवाद ग्रा धरून कोर्टाने आरोपी नीलेश झिंबल याचा जामीन अर्ज नामंजूर केला. यात मूळ फिर्यादीतर्फे अॅड. शशांक साबळे, सरकारतर्फे अॅड. दत्ता पवार यांनी काम पाहिले.