नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकार महागाई कमी करण्यासाठी रोज नव्या उपाययोजना करीत आहे. मात्र, प्रत्यक्षात बाजारात दैनंदिन लागणा-या वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अलिकडे तांदळाचे भावदेखील खूप भडकले आहेत. यापासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, कांदा, डाळींप्रमाणेच आता तांदूळही स्वस्तात उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. केंद्राच्या या योजनेमुळे २५ रुपये किलोने तांदूळ मिळण्याची सोय होणार आहे. या अगोदर केंद्र सरकारने भारत नावाच्या ब्रँडने आटा आणि डाळ स्वस्तात उपलब्ध करून दिली. आता तांदळाचाही असाच ब्रँड तयार करून तो स्वस्तात उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर महागाईपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून फक्त २५ रुपये किलोने तांदूळ विकला जाणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने भारत नावाच्या ब्रँडचे दाळ आणि पीठ लाँच केले होते. यानंतर भारतचाच तांदूळ २५ रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. सरकारने या तांदळाची योग्यरित्या विक्री व्हावी, यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. यापूर्वी या ब्रँडच्या दाळींची आणि पीठाचीही विक्री सुरु करण्यात आली आहे.
एका वरिष्ठ अधिका-याने भारत नावाच्या बँडचा तांदूळ केंद्र सरकारने लाँच केल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केले. सूत्रांच्या माहितीनुसार, नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्र सरकारने नेमून दिलेल्या स्टोअर्समध्ये हा तांदूळ विकला जाणार आहे. केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या भावांबाबत व्यापा-यांना इशारा दिला आहे. सरकार बासमती तांदूळ २५ रुपये किलोने उपलब्ध करून देत आहे. मात्र, तरीही बासमती तांदळाचे भाव ५० रुपये किलोवर पोहोचले आहेत.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी २७.५० रुपयांमध्ये मिळणारा भारत आटा लाँच केला होता. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी ६ डिसेंबरला दिल्लीत हा आटा लाँच केला होता. भारत नावाच्या ब्रँडचे पीठ सध्या १० आणि ३० किलोंच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे. तांदळाप्रमाणेच आटाही नाफेड आणि एनसीसीएफ आणि इतर सहकारी संस्थांमध्ये उपलब्ध आहे. यासाठी सरकारकडून अडीच लाख मेट्रिक टन गहू सरकारी संस्थांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.
कांदा आणि डाळींचीही
केंद्र सरकारकडून विक्री
सध्या ब्रँडेड आटा ३० ते ४० रुपये प्रतिकिलो आहे. काही ठिकाणी याचा भाव ५० रुपयांपेक्षाही जास्त आहे. गव्हाचे भाव सातत्याने वाढल्यामुळे पीठाचेही भाव सातत्याने वाढतात. त्यामुळे नागरिकांना स्वस्तात पीठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने स्वस्तात भारत आटा लाँच केला होता. तांदूळ, आटा याच्याशिवाय केंद्र सरकारकडून कांद्याचीही विक्री करण्यात येते.
साठवण केल्यास कारवाई
केंद्र सरकारने तांदळाची साठवण करून ठेवणा-या व्यक्तीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सरकार तांदळाची साठवण करून भाव वाढवणा-यांंविरोधात अॅक्शन मोडवर आले आहे. त्यामुळे अशा लोकांवर कडक कारवाई होऊ शकते.