अमरावती : अयोध्येत राम मंदिर झाले ही आनंदाची बाब आहे. या मंदिराच्या उभारणीत सा-यांचे योगदान आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण अजूनपर्यंत आलेले नाही; पण मी जाणारदेखील नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ‘श्रद्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नसते,’ अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५व्या जयंती सोहळ्यानिमित्त बुधवारी अमरावतीला आले असता पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही, हे मान्य आहे. या निकालाचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. संसदेत घुसखोरी करणारे युवक कुणाच्या सांगण्यावरून शिरले होते, त्यांना कुणी प्रवेश मिळवून दिला या विषयावर सरकारने माहिती द्यावी ही खासदारांनी मागणी होती. यात चुकीचे काहीही नव्हते. सरकारला संसदेत माहिती द्यायची नसल्याने १४७ खासदारांना निलंबित करण्यात आले. संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडले.
जागावाटप ठरलेले नाही
महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन मुख्य घटक पक्ष आहेत. कुणाला कुठली जागा मिळणार, दिली जाणार याविषयी अजून तरी काहीही ठरलेले नाही. जागावाटपासंदर्भात तिन्ही पक्षांचे नेते बसून लवकरच चर्चा करणार आहेत. तिथेच जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल. हेच सूत्र पुढे ‘इंडिया’साठीही वापरले जाणार, असेही पवार म्हणाले.