नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अनेक देशांसाठी चिंतेचे कारण बनला आहे. एआयची क्षमता अफाट आहे. एआय टूल्स मानव सध्या करत असलेली जवळपास सर्व कामे करू शकतात. एआय टूल जितके चांगले प्रगत असेल तितके अधिक अचूक आणि चांगले परिणाम आपल्या सर्वांना मिळतील. एआयमुळे नोकऱ्या जाणार असल्याची शक्यता वारंवार वर्तवण्यात येत आहे. बलाढ्य अमेरिकेसोबतच तंत्रज्ञानाने सुसज्ज देश सुद्धा एआयबाबत चिंतेत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एआयमुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी आदेश दिले आहेत.
याबाबत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बायडेन यांच्या कार्यकारी आदेशाचे स्वागत केले. राजीव चंद्रशेखर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, वापरकर्त्यांची सुरक्षा हे प्राथमिक उद्दिष्ट बनवण्यासाठी भारत “जगातील आघाडीच्या देशांच्या सोबत काम करत आहे. कोणतेही तंत्रज्ञान धोरण तयार करणे हे एक चांगले पाऊल आहे. यावेळी त्यांनी एआयमुळे लोकांच्या नोकऱ्या जाण्याची भीतीही नाकारली आणि नवीन कौशल्ये शिकण्यावर भर दिला जाईल असेही सांगितले.
राजीव चंद्रशेखर म्हणाले की, सर्वप्रथम, अमेरिकन सरकारने जे काही केले, त्यासाठी मी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूएस दौऱ्यादरम्यान अमेरिका आणि भारत यांच्यात झालेल्या ऐतिहासिक सामंजस्य करारांतर्गत हे सर्व असल्याचे त्यांनी सांगितले. चांगली गोष्ट ही आहे की अमेरिका आता सुरक्षा आणि विश्वास आणि जबाबदारीबद्दल बोलत आहे. प्रत्येक देशाचा दृष्टीकोन थोडा वेगळा असू शकतो यावर जोर देऊन राजीव चंद्रशेखर म्हणाले की, भारत वापरकर्त्यांच्या हानीसाठी एक समग्र फ्रेमवर्क तयार करण्याचा प्रस्ताव देत आहे, जो सुरक्षा आणि पारंपारिक विश्वासावर आधारित आहे.
मूलभूत तत्त्वे समान
राजीव चंद्रशेखर म्हणाले की, त्यांना असे वाटते की, तंत्रज्ञान आणि विशेषतः इंटरनेटकडे पाहण्याची भारत आणि अमेरिकेची मूलभूत तत्त्वे समान आहेत, कारण आम्ही सुमारे २४ महिन्यांपासून म्हणत आहोत की, आमची धोरणे आणि नियमन करण्याचा आमचा दृष्टीकोन सुरक्षेवर आधारित आहे. विश्वास आणि उत्तरदायित्व म्हणजे सुरक्षा आणि विश्वास.
महिलांना जास्त धोका
एका नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार, २०३० पर्यंत एआय यूएस जॉब मार्केटवर प्रभाव पाडणार आहे. एआयमुळे डेटा कलेक्शनवर परिणाम होईल. म्हणजेच या क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्या एआयमुळे जातील. अहवालात म्हटले आहे की, २०३० पर्यंत फक्त अमेरिकेत सुमारे १ १.२ कोटी व्यावसायिक बदल होतील. एआयमुळे पुरुषांपेक्षा महिला अधिक नोकऱ्या गमावतील, असेही या अहवालात म्हटले आहे.